मराठी भाषा गौरव दिवस  

 

आजचा दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिन.

 

त्या निमित्ताने माझ्या मराठी भाषेच्या काही आठवणी….

 

गोव्यात बालपण आणि शिक्षण झालं असलं, तरी मराठी ही माझी मातृभाषा आहे.

 

घरात मराठी आणि मित्रांबरोबर कोंकणी मध्ये बोलायचं याची मजा काही वेगळीच आहे. मराठी आणि कोंकणी या जणू आई आणि मावशी सारख्याच आहेत.

 

घरात भरपूर पुस्तकं असल्यामुळे बालपणापासून वाचनाची आवड लागली.

 

चौथी पर्यन्त माझं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालं.

 

मराठी वाचना बरोबरच शाळेत असताना मराठी कथाकथन हा माझा सर्वात आवडीचा विषय होता. तालुका पातळीवर प्रथम क्रमांकाची जी ढाल मिळाली होती ती पहिल्या नंतर आजही ते क्षण आठवतात.

 

मागे वळून बघताना .. मराठी माध्यमाच्या शाळेत जरी प्राथमिक शिक्षण झालं असलं तरी मला असं कधीच जाणवलं नाही की पुढे इंग्रजी मध्ये व्यवहार करणं कठीण वाटलं.

 

साधारण अकरावी – बारावीत असताना मला मराठी साहित्याची आवड निर्माण झाली. सर्वात जास्त वाचण्यात आलेली मराठी पुस्तकं म्हणजे पु. ल. देशपांडे यांची पूर्वरंग, अपूर्वाई इत्यादि. ऐन परीक्षेच्या काळात बरीच पुस्तकं वाचल्यामुळे ओरडा पण खाल्लेला आठवतो.

 

अकरावी बारावी मध्ये, विज्ञान आणि गणित जरी समजायला कठीण गेलं तरी मराठी विषयाचा तास मला नेहमीच आवडायचा. अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षी मराठी निबंध लेखनामद्धे मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं.

 

मित्रांशि कोंकणी बोलताना जशी जवळीक वाटते तशीच जवळीक मराठी बोलताना पण जाणवते.

 

परंतु, हल्ली असं लक्ष्यात येतं की मराठी बोलायला लोकांना लाज वाटते. घरात सुद्धा मुलांशी बोलताना हिन्दी किव्वा इंग्रजी बोलण्यात पालकांना धन्यता वाटते. कान्वेंट शाळेत मुलं नाही शिकली तर हल्ली बऱ्याच पालकांना असं वाटत की आपली मुलं मागे पडणार आहेत.

 

मुलांची आकलन शक्ति वाढवायची असेल तर त्यांना मातृभाषेत बोलायला प्रोत्साहन द्या. मातृभाषा पक्की असली तर मुलं कोणतीही भाषा अस्खलित पणे बोलू आणि लिहू शकतील. मराठी मध्ये विचार केल्यामुळे त्यांना आपलं मत मांडायला सोपं जाईल. सद्य स्थिति बघता, आत्ताची पिढी म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था आहे.

 

मुलांना मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण करायची असेल तर त्यांना मराठी पुस्तकं भेट द्या.

 

तुम्ही घरात मराठी बोला आणि मुलांना सुद्धा मराठीत बोलायला प्रोत्साहन द्या. नाहीतर पुढील पिढी नीट एकही भाषा बोलू आणि समजू शकणार नाही. शांतपणे विचार केला तर तुमच्या लक्ष्यात येईल की हल्ली मुलांना धड एकही वाक्य एका भाषेत बोलता येत नाही.

 

आपल्या सणाच्या वेळी मराठी मध्ये शुभेच्छा कश्या द्यायच्या हे मुलांना शिकवा.

 

मुलांना मराठी मध्ये लिहायला प्रोत्साहित करा म्हणजे त्यांची आकलनशक्ति वाढेल.

 

हल्ली गुड मॉर्निंग, गुड नाईट, मम्मी आणि पप्पा याचं खूळ एव्हडं पसरलय की बरेच जण आपली मातृभाषाच विसरत चालले आहेत.

मराठी टिकवायची आणि वाढवायची असेल तर घरात मुलांबरोबर मराठीतच बोला !

 

२७ फेब्रुवारी २०२४