लिहीत रहा..  

 

मागच्या एक ते सव्वा वर्षात गोव्याला जाण्याचा योग आला नव्हता. मुलांच्या परीक्षा संपल्यामुळे आणि पुढच्या परीक्षेसाठी अजून एक महिना असल्यामुळे गोव्याला घरी जाण्याचा बेत आखला. ठाण्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे शाळांना सुट्टी जाहीर झाली आणि त्यामुळे परीक्षा दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या. झालं …. एकतर सव्वा वर्षानंतर बेत बनवलेला, तिकीटं सुद्धा काढलेली आणि अशावेळी, पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा बरोब्बर निघायच्या दिवशी घोषित करण्यात आली. ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीची पटकन आठवण झाली.       

 

अनेक वर्षांपासून काही मित्रांची भेट झालेली नसल्यामुळे विचार केला होता की काही मित्रांना घरी बोलवावं आणि छान गप्पागोष्टी कराव्यात. परीक्षा पुढे गेल्यामुळे त्या बेतावर सुद्धा विरजण पडलं. जवळ जवळ १७ वर्षे मुंबई / ठाण्यात राहिल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जायचं ही शिकवण मिळाल्यामुळे तसं फार दुःख नाही झालं. ‘कोणत्याही प्रसंगाला सामोरं जायचं’ हे यासाठी म्हणतोय कारण पूर येणे, अनेक तास ट्रॅफिक मध्ये अडकणे, ट्रेन बंद असल्यास काही किलोमीटर चालत जाणे या गोष्टींच ट्रेनिंग नाही म्हटलं तरी प्रत्येक ठाणे / मुंबई कराला दरवर्षी मिळतच असतं. 

 

थोडा विचार केला, पुढच्या कोणत्या तारखा सोयीच्या होतील याची पडताळणी केली आणि आठ दिवसांनी बेत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. लगेच ट्रेन तिकीटं मिळतायेत का याची खात्री केली, मुलांच्या शाळेचं वेळापत्रक बघितलं, आधी काढलेली तिकीटं रद्द केली आणि नवीन तिकीटं लगेच काढली. त्या रात्री फार मोठा पराक्रम केल्या प्रमाणे वाटत होतं. 

 

निघायला एक आठवडा असताना, काही मित्रांना फोन केला, मेसेजिस पाठवले आणि ट्रीप च्या दरम्यान येणाऱ्या रविवारी घरी भेटायचा बेत आखला. दिवस जवळ येत होते आणि पाऊस कमी होण्याची काही चिन्हे दिसेनात. शेवटी, निघायच्या आदल्या दिवशी पाऊस थोडा कमी झाला. जास्त पाऊस असल्यास कोकण रेल्वे उशिरा धावते याचा चांगलाच अनुभव गाठीला असल्यामुळे, पाऊस थोडा का होईना कमी झाल्याचं पाहून हाय वाटलं. 

 

सकाळी पाणवे सहाची ट्रेन असल्यामुळे, सामानाची जमवा जमव आधीच सुरू केली होती परंतु कितीही वेळ मिळाला तरी इंजीनीरिंगचं संबमिशन आदल्या रात्रीच पूर्ण होतं, तसं रात्री दहा वाजेपर्यंत बॅग भरणं चालूच होतं. त्यात मुलं मोठी झाल्यामुळे, त्यांना आपल्या वेगळ्या बॅग्ज घायच्या असतात. मग मी काय घेणार, तू काय घेणार, मी कोणती बॅग घेणार, तू कोणती बॅग घेणार ही चर्चा अजून एक तास चालली होती. बरं, त्या स्वतंत्र बॅग्ज मध्ये नेमकं काय घेणार हे पालकांनी विचारायची किंवा बघायची सोय आता राहिलेली नाही. तरीसुद्धा, दोघांच्या बॅग्स तपासून अर्ध सामान बाहेर काढलं त्यात अजून अर्धा तास कधी निघून गेला ते कळलंच नाही. झोपायला साडे अकरा कधी वाजले ते कळलंच नाही. ट्रेन लवकर असल्यामुळे साडेतीन चा गजर लावलेला होता. 

 

डोळा लागतो न लागतो तेव्हडयात गजर वाजू लागला. स्टेशन ला जाण्यासाठी पवणेपाच ला गाडी बोलावली होती. अंघोळी उरकून, बॅग्स पुन्हा एकदा तपासून आवरे पर्यन्त कॅब ड्रायव्हर चा फोन आलाच. सकाळी जास्त पाऊस नसल्यामुळे ठरलेल्या वेळेत स्टेशनला पोचलो. जीव एकदाचा भांड्यात पडला ! पहाटे निघणार, हवा थंड असणार म्हणून मुलांना जॅकेट घालून नेलेलं. परंतु प्लॅटफॉर्म वर गरमच वाटत होतं. ट्रेन चा डबा कुठे येणार, दरवाजा कुठे येणार हा गोंधळ नेहमीच असतो (वर नंबर लावलेले असले तरी). ट्रेन आल्यानंतर कोणी आधी चढायचं, कोणी कोणती बॅग घ्यायची यावरून मुलांची चर्चा सुरू झाली. मग, मी आईच्या आधी चढणार, मी आईच्या मागोमाग चढणार ही चर्चा रंगलेली असताना ट्रेन आली आणि सर्वजण आत चढलो व प्रवास सुरू झाला. 

 

वाटेत अधून मधून पाऊस पडत होता आणि निसर्गाचा आस्वाद घेत प्रवास चालला होता. अनेक वेळा सिग्नल मुळे थांबावं लागत होतं. प्रत्येक स्टेशन ला येणारे चहा, समोसा, वडा पाव विक्रेते यांच्यामुळे डब्यात बऱ्यापैकी वर्दळ होती. घरून सँडविच, लाडू आणल्यामुळे मुलांच्या खाण्या पिण्याची चिंता नव्हती. रत्नागिरीला पोचल्या नंतर वडा पाव नाही खाल्ला तर कोकण रेल्वे चा प्रवास केल्या सारखं वाटतच नाही त्यामुळे वडा पाव व चहाचा आस्वाद घेऊन प्रवासाला पुढे सुरुवात झाली. अनेक वेळा सिग्नल मिळत असल्याने ट्रेन साधारण दीड तास उशिरा धावत होती. त्यामुळे, साडेतीन च्या ऐवजी संध्याकाळी पांच वाजता थिवी ला पोचलो. घरी पोचे पर्यन्त साधारण सहा वाजले. 

 

रात्री मित्रांना फोन आणि मेसेज करून आठवण केली. दुसऱ्या दिवशी घरची काही कामं आटोपून तयारी सुरू झाली. नेमका त्या दिवशी संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. जोरदार पाऊस असून सुद्धा, ज्या ज्या मित्रांना निमंत्रण दिलं होतं ते सर्वजण आले. बराच वेळ गप्पा रंगल्या. पंधरा ते वीस वर्षांनी सर्वजण जमलो होतो. आधीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

 

माझ्या लिखाणाला मित्र नेहमीच दाद देत असतात. मागच्या तीन वर्षात वकिली करत असल्यामुळे अवांतर लिखाण खूप कमी झालं होतं. त्या दिवशी एका मित्राने एक छान पेन भेट दिलं आणि म्हणाला “लिहीत रहा”. त्याचे शब्द ऐकून पुन्हा एकदा लिखाण सुरू करावं असं वाटू लागलं. पुढचे दोन दिवस घरी मुक्काम झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. बॅग मधून समान काढताना त्याने दिलेलं पेन सापडलं आणि त्याचे शब्द आठवले. काही कामं मार्गी लावून त्याच पेनाने लिखाणाला सुरुवात केली. लिखाण हे माझ्यासाठी एक खूप चांगला विरंगुळा आहे आणि यापुढे वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करीत राहीन.

 

अवांतर लिखाणासाठी एक हक्काची जागा पाहिजे होती .. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी बनवलेली ही वेबसाईट उपडेट केली. 

 

६ ऑगस्ट २०२६